खेळ मांडला …..

स्पर्धा परीक्षांतील विलंब -परीक्षार्थींच्या समस्या - प्रश्न अनेक आहेत आणि गंभीरही ......

Saturday, November 19, 2016 Jaypal Khedkar 6 comments

                                                                                                                                                                                       

खेळ मांडला ….................

का र लेका ,अजून अब्यासच करतोयस व्हय?कवा येनार तुझी जाहिरात अन कवा व्हायाचास त्वा अधिकारी ??असे नाहीतर, किती वर्ष शिकणारेस काही काम करणार आहेस कि नाही ?हे प्रश्न आमच्या पाचवीला पुजलेले.भाषा बदलेल पण एकाच चिंतेने व भावनेने सर्वच विचारात असतात .परंतु काल झालेल्या शासन निर्णयाची घोषणा स्वागतार्ह आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींना आता लवकरात लवकर परीक्षा होतील ,एकत्रित पूर्वपरीक्षेमुळे वेळ ,परीक्षा शुल्क वाचेल,निवड प्रक्रिया लांबणार नाहीत या बाबी दिलासा देणाऱ्या आहेत.अर्थात त्यामुळे सरकार आणि यंत्रणेचे आभार ..

काहीसा विचार केला तर हि घोषणा म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या विद्यार्थी महामोर्चाची परिणीतीच आहे.अशा प्रकारे विधायक निर्णय घेण्यास शासकीय यंत्रणांना मोर्चे बांधून - आंदोलने उभारून - निवेदने पोचवून साकडे घालावे लागते हि बाब मात्र मनात गोंधळ आणि चिंता निर्माण करते.अशीच घोषणा मागे झाली -पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ३ वर्षे वयोमर्यादा वाढवली.साधारण वर्ष- दीड वर्ष होत आले ,अजूनही त्याची जाहिरात आली नाही.अर्थात घोषणा - निर्णयाने तात्पुरते गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा मानस का नसावा? असा विचारही येतो.यावर कोणी युक्तिवाद देईल कि,"शासनाने म्हणूनच तर सर्वच पदासाठीची वयोमर्यादा तब्बल ५ वर्षांनी वाढवलीय."  म्हणून मग ५ वर्षे जाहिरात अन नोकरभरती करायची नाही का ?कि वयोमर्यादेची अर्हता संपेपर्यंत चाळीशीच्या वयातपर्यंत वाट पाहायची?एकुणात इतकंच कि,निर्णय जितके जलद घेऊन घोषणा केल्या जातायत तितक्या जलदतेने त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे .का परत त्यासाठी एखादं आंदोलन करावं लागेल ?

स्पर्धा परीक्षांतील विलंब -परीक्षार्थींच्या समस्या - प्रश्न अनेक आहेत आणि गंभीरही ..

मुळात सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक बाजू भरभक्कम आहे असे नाही. पैश्यांची तारांबळ कधी चण-चण- सकाळच्या चहा पासून रात्रीच्या जेवणापर्यंत ,खोलीच्या भाड्यापासून अभ्यासिकेच्या भाड्यापर्यंत ,पुस्तकाच्या खर्चात कधी परीक्षेचं शुल्क तर कधी बस तिकीट ,क्लासेसच्या बाजारात सुरुवात ५ आकड्याच्या फी ने होते. त्यात पुणे,मुंबई,औरंगाबाद आदी शहरात  राहणं म्हणजे तारेवरची कसरत होते .तरीही अधिकारी होण्याच्या जिद्दीनं आशेनं तो मात देत झगडत असतो.अशा सर्वच विध्यार्थ्यांना जाहिरातीस लागणारा विलंब एक तर हलाकीचा बनतो नाहीतर हे क्षेत्र  सोडून "गड्या आपला गाव बरा" करत जाण्यास  भाग पाडतो.तर दुसरीकडे आर्थिक सुबत्ता असली तरी ३-३ वर्ष जाहिरात नाही असे झाल्यास वाढलेल्या वयोमर्यादेचा फायदा होईल मात्र वयाच्या चाळिशीपर्यंत नोकरीसासाठीच आयुष्य वेचणाऱ्या विद्यार्थ्यांची पारिवारिक बाजू नक्की लंगडी असेल. वाढत्या स्पर्धेत यशापर्यंत न पोचलेल्या विद्यार्थ्यांची अवस्था फार बिकट आहे."भावी  अधिकारी "म्हणून गौरवणारा समाज अपयशापोटी " अधिकारी-अधिकारी  " अशी अवहेलना करतो.काहीवेळा शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगत अभियांत्रिकी ,वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीही बड्या नोकऱ्यांना डावलून आलेले आहेत. तशातच सतत लागणाऱ्या जाहिरातीच्या विलंबामुळे मधेच पुन्हा दुसरी नोकरी करावी कि वाट बघत अभ्यासच ?अशी द्विधा मनःस्तिथी होते ."आई जेवायला देईना अन बाप भीक मागू देईना "असल्या चौकटीत जणू उमेदवार अडकतात .नंतर त्यानां वाढलेल्या  वयामुळे खाजगी क्षेत्रात कोणी उभंहि करत नाही.डोक्यात ज्ञान असूनही मग त्याला दुर्लक्षित करून उपजीविकेचं साधन शोधावं लागत.यासाठी शासकीय स्तरावर यंत्रणांनी काही उपाय योजिले का?

आंदोलन करावी लागण हि शोकांतिका ...

मुळात या सर्व परिस्थितीचा सरकारी यंत्रणांना सुगावा -मागमूस -कल्पना-सर्वच आहे.आज आपल्या प्रशासनात नामांकित आणि लढवय्ये अधिकारी आहेत.काही अंशीना या बाबींची कल्पना आहे. तरीही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. आयोग राजकीय आदेशाची कारण सांगत आणि राजकीय वर्तुळातील समीकरण आंदोलनाशिवाय हालेनात .यात तोटा तो पुन्हा विध्यार्थ्यांचाच होतो.कारण ,अभ्यास सोडून द्यावा लागणारा वेळ,काही पैसे ,मनुष्यबळ आणि सर्वात वेदनाशील म्हणजे ज्या यंत्रणेचे भाग होण्याची स्वप्न मनात आहेत, त्याविरुद्ध हक्कासाठी आंदोलनातून लढा देण्याचे दुर्दैव. अभ्यास सोडून आंदोलन म्हणजे तालमीत तयार होणाऱ्या मल्लाला सरावाचे डावपेच कमी आखाडा खणण्यातच वेळ घालवावा लागतो मग नामचीन मल्ल तयार होणार कसे ?आणि  मानाची गदा अन फेटा नुसताच स्वप्नवत राहील.

यासाठी खरंच योग्य त्या नियोजनाने हे नक्की साधता येईल.कदाचित ,असच चालत राहिल तर  जो काही करत नाही तो MPSC करतो, अशी खिल्ली नक्की उडविली जाईल.

आज आंदोलन करण्यास उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची मानसिकता प्रचंड ताकदीची आणि आशावादी आहे.नव्या भारताच्या जडण घडणीत प्रशासनात जाऊन आपला योगदान करण्यास तो नक्कीच उतावीळ आहे.नोकरभरतीच्या उदासीनतेची आणि कागदी घोडे नाचवत लागणाऱ्या विलंबाची त्यास घृणा आहे.जादूची कांडी फिरेल आणि सगळं कुशल मंगल होईल असं मुळीच नाही.मात्र ,आलेल्या निर्णयाचे आणि झालेल्या घोषणेचे चित्र विनासायास जलद नक्की येऊ शकते.प्रश्न अनेक असतात - उत्तरेही .ती जमवावी लागतात आपल्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून.

पुनश्च्य ,मित्रहो,आपलेही अभिनंदन ..आंदोलनाच्या वाटेने आलेला  निर्णय आपल्यास मनापासून स्वागतार्ह आहे.आणि आपली बाजू समजून त्याची अंमलबजावणी तत्पर होईल ,हि माफक अपेक्षा ...

- जयपाल मारुतीराव खेडकर.

९५९५६०९८४०Jaypal Khedkar 9595609840
jmkhedkar@gmail.com

Gallery

Share:

Rachel Britain
Marketing Specialist

Mauris elementum et libero ac pharetra. Proin tristique dapibus tellus, lacinia blandit mi tincidunt at. Vivamus vitae interdum felis. Pellentesque congue mollis erat in imperdiet.

Previous Post Next Post

;